जायकवाडीतून एक्सोपर्ट होणाऱ्या पाण्यातून वंचित भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागेल - जलतज्ञ
- Source : official
- Oct 22, 2024
अहमदनगर, 22 ऑक्टोबर । जायकवाडी धरणातून एक्सपोर्ट होणा-या पाण्यातून वंचित भागाचा पाणीप्रश्न मार्गी लागेल,अशा भावना जलतज्ज्ञ तथा निवृत्त कार्यकारी अभियंता जयप्रकाश संचेती यांनी व्यक्त केल्या.लोक लढा आंदोलनातील संयोजकांनी अहिल्यानगर येथे जलतज्ज्ञ संचेती यांची भेट घेतली.यावेळी ते बोलत होते.
जायकवाडीच्या पाण्यासाठी गेवराई तालुक्यातील सिंदफणा पट्ट्यातील (बीड जिल्हा)१४० गावच्या शेतकऱ्यांनी लोकलढा आंदोलन उभारले आहे.या आंदोलनाचे संयोजक दिनेश गुळवे,कुक्कडगाव येथील राजाभाऊ महाराज कुटे,देविदास चव्हाण, महादेव रडे,गणेश जाधव यांनी स्नेहालय कार्यालयात संचेती यांच्याशी चर्चा केली.
यावेळी मार्गदर्शन करताना जयप्रकाश संचेती म्हणाले की,नव्या जल आराखड्याप्रमाणे दोन हजार दशलक्ष घन मीटर पाणी एक्सपोर्ट (खाली सोडले जाणार आहे) केले जाणार आहे.यातील काही पाणी वंचित भागाकडे वळविल्यास पाणीप्रश्न मार्गी लागेल.मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेतुनही पाणी मिळण्यासाठी करावयाचे प्रयत्न,मराठवाड्यातील पाणी प्रश्न व पाणी परिस्थिती,कशा प्रकारे पाठपुरावा करावा आदी संदर्भात जयप्रकाश संचेती यांनी चर्चा करत मार्गदर्शन केले.