अमरावतीत पोलिस आयुक्तांनी केले गुन्हेगारांचे समुपदेशन

Image Source By : Marathi Voice

अमरावती 24 जुलै गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी गुन्हेगारांचे समुपदेशन शहर पोलिसांकडून करण्यात आले. यावेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर गुन्हे असलेल्या शहरातील सुमारे २०० गुन्हेगारांना वसंत हॉल येथे एकत्र करण्यात आले होते. गुन्हेगारी सोडा, चांगले जीवन जगा, मात्र तुम्ही बदलले नाही तर तुम्हाला मिळालेले जामीन रद्द करण्यासाठी प्रयत्न करू तसेच एमपीडीएसारख्या कारवायासुद्धा करण्यात येतील, असा समुपदेशनवजा इशारा पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हेगारांना मंगळवारी दिला आहे. पोलिस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारीवर आळा बसावा व गुन्हेगारांनी गुन्ह्यांपासून परावृत्त व्हावे,या दृष्टिकोनातून पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून गुन्हेगारांचे समुपदेशन करण्यात आले होते. या वेळी खून, खुनाचा प्रयत्न व गंभीर गुन्हे करणाऱ्या २०० गुन्हेगारांना वसंत हॉल येथे बोलवले होते. याठिकाणी त्यांचे नाव, पत्ता व इतर वैयक्तिक माहिती, रोजगाराचे साधन, त्यांच्यावरील दाखल गुन्ह्यांची माहिती, त्यांचे गुन्हेगारी क्षेत्रातील सहकारी, त्यांच्या सोशल मीडियाबाबतची माहिती तसेच बोटांचे ठसे व फोटो पोलिसांनी प्राप्त केले आणि या गुन्हेगारांची माहिती अद्ययावत करण्यात आली. तसेच ज्या गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाई केली नव्हती. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाँटेड आरोपी ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. गुन्हेगारांना न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनाचा योग्यरित्या उपयोग घेऊन उत्कृष्ट सामाजिक जीवन जगावे, गुन्हेगारीचा मार्ग सोडून द्यावा. गुन्हेगारीत अडकल्यास शैक्षणिक व रोजगार विषयक चारित्र्यावर परिणाम होतो. गुन्हेगार युवकांना सरकारी नोकरीपासून वंचित रहावे लागते. त्यामुळे ते बेरोजगार होऊन ते व्यसनाधीनतेकडे वळतात. तसेच त्यांच्याविरुद्ध तडीपारी, एमपीडीए, संघटीत गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई रण्यात येईल, असा इशारा उपस्थित गुन्हेगारांना देण्यात आला. या वेळी पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, गणेश शिंदे, सागर पाटील, एसीपी शिवाजी बचाटे, जयदत्त भंवर, अरुण पाटील, कैलास पुंडकर सर्व ठाणेदार, गुन्हे शाखेचे दोन्ही पीआय व अंमलदार उपस्थित होते.