'राधानगरी'चे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडले, सतर्कतेचा इशारा
- Source : digital satta
- Jul 31, 2024
* पंचगंगा अजूनही धोका पातळीवर
कोल्हापूर, ३१ जुलै यंदाच्या पावसाळ्यात राधानगरी धरण १०० टक्के भरले असून पहिल्यांदाच धरणाचे सर्व स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून सुमारे ११,५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून १७२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आधी फक्त दोनच दरवाजे उघडले होते. दरम्यान, आज पहाटे ४.५० ते ५.५० वाजेच्या दरम्यान पाच स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. यामुळे आता पंचगंगा नदीची पाणी पातळी ४३ फुटांवर असून धोका पातळीवर वाहत आहे. नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता होती. त्यामुळे कोल्हापूर आणि आजूबाजूच्या भागाला पूराच्या पाण्याने वेढले गेले आहे. जिल्ह्यातील ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर
दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा जोर वाढला आहे. महाबळेश्वरसह कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. कोयना धरणात ४३ हजार क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे कोयना धरणाच्या सहा वक्र दरवाज्यातून ४० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. धरणात जवळपास ८५.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.